अंतर्गत गुण न मिळाल्याने टक्केवारीला फटका; दहावीच्या निकालात झाली घट

Foto

औरंगाबाद : आतापर्यंत विद्यार्थ्यांना घोकमपट्टीला वाव मिळत होता. त्यातच विद्यार्थ्यांना तोंड पाहून शाळेकडून भरमसाठ अंतर्गत गुण मिळत होते. त्यामुळे दहावीच्या निकालाचा आकडा वाढताना दिसत होता. परंतु यावर्षी घोकमपट्टीला आळा बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतीपत्रिका सोडवाव्या लागल्या तसेच अंतर्गत गुणही दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. परिणामी निकालात घट झाली. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १२.९५ टक्क्याने दहावी निकालात घट झाली आहे. यामुळे विद्यार्थीही अडचणीत सापडले आहेत. निकाल घसरला कसा? याशिवाय कमी गुण मिळाले कसे? असे प्रश्‍न विद्यार्थीवर्गाकडून उपस्थित केले जात आहे. मागील वर्षी विभागातून १ लाख ८८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ६७ हजार २४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण विभागाचा निकाल ८८.८१ टक्के एवढा लागला होता. मात्र यावर्षी विभागातील १ लाख ८३ हजार २२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३७ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकू.ण विभागाचा निकाल ७५.२० टक्के लागला. यावर्षी तब्बल बारा टक्क्याने दहावहीचा निकाल घसरला आहे. 

यामुळे घसरला निकाल 
दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना घोकमपट्टी करायची संधी याआधी मिळत होती. परंतु यावर्षी अभ्यासक्रमात बदल झाला. तसेच उत्तरपत्रिका ऐवजी कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी लिहाव्या लागल्या. त्यामुळे भोकमपट्टीला आळा बसला. यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली. तसेच मूल्यमापन पद्धती बदलली. याशिवाय शाळेमार्फत भाषा विषयांना २० गुण दिले जात होते. तेही यावर्षी बंद केले. विद्यार्थ्यांना शंभर मार्काचा पेपर लिहावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. याशिवाय मागील वर्षी दहावीचाच अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागत होता. परंतु यावर्षी नववी अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्‍न विचारले गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पुढचे पाठ मागेचे सपाट अशी अवस्था झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले. परिणामी यावर्षी दहावीचा एकूणच निकाल घसरला.  

यापुढे विद्यार्थ्यांना अभ्यासच करावा लागणार 
दर्जात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने पाऊल उचलले आहे. त्यामुळे दहावी अभ्यासक्रम आणि परीक्षा  पद्धतीत बदल केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासच करावा लागणार आहे. यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचे बोर्डाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.सॅक